मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व प्राप्त झाले असून, त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्ह्यात “सक्षम मुलगी—सुरक्षित समाज” या नावाने पीएम उषा अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण राबविण्यात आले. आजची मुलगी शिक्षणात, क्रीडेत, प्रशासनात, विज्ञानात आघाडीवर आहे. मग सुरक्षिततेच्या बाबतीत मागे का राहायचे? आत्मरक्षा ही प्रत्येक मुलीचा अधिकार आहे आणि तिची जबाबदारी देखील. तुमच्यात अपार शक्ती आहे. तुमचा आत्मविश्वास, तुमचे धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता हीच तुमची खरी ढाल आहे. सजग राहा आणि निर्भयपणे पुढे चला. आत्मरक्षा म्हणजे फक्त स्वतःचा बचाव करणे नाही, तर स्वतःच्या सन्मानाचे, स्वाभिमानाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे होय. आजच्या वेगवान आणि बदलत्या जगात मुलींनी सर्व क्षेत्रांत आपली छाप पाडली आहे. परंतु या प्रगतीसोबत स्वतःची सुरक्षा हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा खापरे यांनी व्यक्त केले. दिनांक ३१ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे पीएम उषा अंतर्गत मुलींच्या स्वसंरक्षण या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा खापरे आणि सौ. शाहीनताई, अध्यक्ष दृष्टी फाउंडेशन, अहेरी हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोलीचे प्राचार्य श्री. विशाल नितनवरे होते. सौ. शाहीनताई यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करणे असो, तंत्रज्ञानाचा सुरक्षितपणे वापर करणे असो किंवा अनपेक्षित परिस्थितीत शांतपणे प्रतिसाद देणे असो, परिस्थितीजन्य जागरूकता केवळ तुमची सुरक्षितताच नाही तर तुमचे स्वातंत्र्य देखील मजबूत करते. ज्या जगात आव्हाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय उद्भवू शकतात, तिथे ज्ञान हे तुमचे सर्वात मोठे ढाल आहे आणि आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मजबूत साथीदार आहे. लक्षात ठेवा, जागरूकता म्हणजे भीतीने जगणे नाही – ती तयारी आणि शहाणपणाने जगणे आहे. आत्मरक्षा ही कमजोरीची नाही, तर सामर्थ्याची ओळख आहे. आत्मरक्षेचे पहिले पाऊल म्हणजे जागरूकता. दुसरे पाऊल म्हणजे आत्मविश्वास.
तुमची चाल, तुमचा आवाज, तुमची देहबोली – हे सर्व तुमचा आत्मविश्वास दाखवतात. आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीकडे कोणी सहजपणे वाईट नजरेने पाहत नाही. असे विचार सौ. शाहीनताई यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून श्री. लालसिंग यादव, श्री. संदीप पेदापल्लीवार व त्यांच्या चमूने मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले व प्रास्ताविक अधिव्याख्याता श्री. जहीर हकीम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमाला मुलचेरा येथील विद्यार्थिनी उपस्थित होते.

