मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली:- गडचिरोली शहरातील प्लॅटिनम जुबली हायस्कूलच्या परिसरात शाळेच्या इमारतीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावरुन झालेल्या हल्ल्यात जवळपास 20 विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. 28 जानेवारी रोजी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शाळा परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेत दोन मुले व एक मुलगी असे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर जखमी मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून मानव वसंत चापले (वय 13) व तेज मधुकर कोडाप (वय 13) हे आठवीतील दोन्ही विद्यार्थी रात्री आठ वाजेपर्यंत रुग्णालयात उपचार घेत होते. सुदैवाने या दोघांसह सर्व जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर दुपारीच घरी सोडण्यात आले.
दरम्यान, घटना घडूनही दुसऱ्या दिवशी शाळेच्या इमारतीवर मधमाशांचे पोळे अद्याप कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावरुन शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कितपत गांभीर्य दाखवत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, सदर मधमाशांचे पोळे तात्काळ हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.
घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

