ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा (गडचिरोली):
सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या टेकडा (टेकडा ताला) येथे अखेर बस सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही बस सेवा सुरू होण्यासाठी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे तालुका अध्यक्ष रवि बारसागंडी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
टेकडा परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व कामगारांना दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळा, महाविद्यालय, दवाखाना, तहसील व बाजारपेठेत जाण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. या गंभीर समस्येची दखल घेत रवि बारसागंडी यांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने देत बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत टेकडा येथे नियमित बस सेवा सुरू केली, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी ये-जा करणे आता अधिक सोपे होणार आहे.
बस सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे व विशेषतः तालुका अध्यक्ष रवि बारसागंडी यांचे आभार मानले असून, ही सेवा कायमस्वरूपी व नियमित ठेवण्याची मागणीही केली आहे.

