अहेरी :
अहेरी तालुक्यातील जोगनगुडा गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एका गरीब कुटुंबाचे घर पूर्णपणे जळून खाक झाले असून सोनं, कपडे व रोख रक्कम मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरकुट कुटुंबीय रात्री शेतात राखण करण्यासाठी गेले असताना अचानक त्यांच्या घराला आग लागली. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील सोनं, कपडे, रोख रक्कम आणि जीवनावश्यक साहित्य आगीत भस्मसात झाले. या घटनेमुळे हे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी प्राचार्य डॉ. रतन दुर्गे, जे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा सचिव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी घटनास्थळी भेट देत बोरकुट कुटुंबाला आर्थिक मदत केली व धीर दिला.
यावेळी त्यांनी शासनाने तातडीने पंचनामा करून या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे नेतेही मदतीसाठी पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाईट (डॉ. रतन दुर्गे) :
“जोगनगुडा येथे लागलेल्या आगीत बोरकुट कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. हे अतिशय गरीब कुटुंब असून त्यांचे सर्व संसार साहित्य जळून खाक झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, तसेच समाजातील सर्वांनीही या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा,” असे आवाहन माजी प्राचार्य डॉ. रतन दुर्गे यांनी केले.
