मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या रजत सुनील वाळके यांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशातून ५१४ वी रँक मिळवून रजत यांनी गडचिरोली जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.विशेष म्हणजे, २०२१ मध्ये त्यांची सीआरपीएफ (CRPF) मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली होती. ओडिशात अत्यंत खडतर अशा नक्षलविरोधी मोहिमेवर तैनात असतानाही त्यांनी आपला अभ्यासाचा सराव सोडला नाही. कर्तव्यावर असतानाच त्यांनी यूपीएससीचे हे यश संपादन केले आहे.रजत यांचे वडील जिल्हा परिषदेत कार्यरत होते. मात्र, रजत सीआरपीएफमध्ये रुजू होत असतानाच वडिलांचे छत्र हरपले. या दु:खद प्रसंगातून सावरत त्यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या मोठ्या भगिनी स्नेहा आणि शितल (दोघीही शासकीय सेवेत कार्यरत) यांचे मोलाचे पाठबळ लाभले.
*तनुश्रीताईंकडून कौतुकाची थाप*
रजत यांच्या यशाची दखल घेत तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. “गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात राहून आणि कर्तव्यावर असताना यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे ही बाब तरुणांसाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. यावेळी माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनीही रजत यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
*”वडिलांचे स्वप्न आणि प्रशासकीय सेवेची आवड यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो,” अशी भावना रजत वाळके यांनी सत्कारादरम्यान व्यक्त केली.*
