युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राजस्थानातील सालासर रोडवर एक भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका कुटुंबावर दुःख पसरले आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पारसे कुटुंब हे प्रसिद्ध खाटु श्याम मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी प्रवासादरम्यान सालसार वर त्यांच्या टवेरा कारला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघात अत्यंत भीषण होता.
या भीषण अपघातात महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात चालक मनोज चिंदमवार, आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच कामठी येथील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली. मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर ते पुढील विधीसाठी कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
