डॉ. लुबना हकीम यांनी विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मौल्यवान मार्गदर्शन केले.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी येथील भगवंतराव हायस्कूलमध्ये जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी महागाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थिनींना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गहुकर सर होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदाराम येथील सी.एच.ओ. कु. सुरभी शिल्पकार, मडावी मॅडम तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. गोबाडे सर व कु. चांदेकर मॅडम उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. लुबना हकीम यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीतील स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) व स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) याबाबत सविस्तर माहिती देत, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना व वेळेवर निदानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी HPV (Human Papillomavirus) लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करत, योग्य वयात लस घेतल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उत्तर देत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःचे प्रश्न विचारून आपल्या शंका दूर करून घेतल्या. यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व ज्ञानवर्धक ठरला.
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संगिडवार मॅडम यांनी केले, तर श्री. निलम सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ या देशभक्तिपर गीताने करण्यात आला.
