मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील दानशूर चौक परिसरात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एक स्टेशनरी दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक नंदू समुद्रालवार यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे अंदाजे 3:00 वाजताच्या सुमारास घडली. प्राथमिक चर्चेनुसार दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच तीने विक्राळ रूप धारण केले आणि दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला कळविले. मात्र, अग्निशमन दलाचे वाहन सुमारे एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
दरम्यान, वीजपुरवठा बंद करण्यासाठी काही नागरिक एम.ई.सी.बी. (महावितरण) कार्यालयात गेले असता तेथे कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा व वीज विभागाने तत्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सदर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त व्यापाऱ्यास आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

