महाराष्ट्र संदेश न्यूज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन मुंबई:- कल्याणमधील कोळसेवाडी भागात एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे. या गंभीर प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई करत 60 वर्षांच्या दोन नराधम आरोपींना, अख्तर मनियार आणि सलीम शेख यांना ताब्यात घेतले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास घरातून मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्यावर परिसरातील रहिवाशांना संशय आला. लोकांनी वेळीच सतर्कता दाखवून त्या घराकडे धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर त्यांना घरभर रक्ताचे डाग दिसले आणि त्यांनी तातडीने कोळसेवाडी पोलिसांना या प्रकाराची सूचना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. आरोपींपैकी अख्तर मनियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहाचा स्टॉल चालवतो, तर सलीम शेख हा रिक्षा चालक आहे. हे दोघे रात्रीच्या वेळी त्या मुलीला घरी घेऊन आले होते. या घराचा खरा मालक मुंबईत राहतो आणि केवळ भाड्याच्या वसुलीसाठी कधीतरी कल्याणला येतो. आरोपी मनियार या घरात वारंवार अनेक व्यक्तींना आणि मुलींना घेऊन येत असे, त्यामुळे या ठिकाणी देहविक्रीचे रॅकेट चालवले जात होते का, याची कसून चौकशी आता पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, यामागे आणखी कुणाचा हात आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कल्याणमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
