मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
चांदवड :- तालुक्यातील कातरवाडी शिवारात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लाकडी दांडक्याने मारहाण करून चाळीस वर्षीय युवकाचा खून केला आहे. या घटनेत मृताचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मनीषा सोपान झाल्टे यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिली आहे. सोपान बाबुराव झाल्टे वय ४० वर्ष, रा. कातरवाडी शिवार, ता. चांदवड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा यांचे सासरे बाबुराव महादू झाल्टे हे आजारी असल्याने त्यांच्या कातरवाडी शिवारातील घरातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. त्यांच्या देखभालीसाठी पती सोपान बाबुराव झाल्टे हेही त्यांच्यासमवेत पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणावरून पती व सासरे यांना लाकडी दांडकने मारहाण केली. त्यात पती सोपान झाल्टे हे रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. सासरे बाबुराव झाल्टे हे गंभीर जखमी झाले. जखमी बाबुराव झाल्टे यांच्यावर मनमाड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.
मृतक सोपान झाल्टे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. घटनेनंतर मनमाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत मनीषा झाल्टे यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348