✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- राज्यातील सर्व पोलिसांना एक महिन्याचा पगार दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे म्हणून पोलिस बॉयिज असोसिएशन नागपूर या संघटनेच्या वतीने नागपूर येथील विधानसभा समोर असलेल्या संविधान चौकात धरणे आंदोलन केले. पोलिसाना दिवाळीचा बोनस नाही मिळाला तर पोलिस बॉयिज असोसिएशन नागपूर (महा) ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सण कोणताही असो, पोलीस बांधवांना तो साजरा करता येतच नाही. घरदार कुटुंब सोडून तो जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट करत असतो. आमदार-खासदार मंत्र्यांचे दौरे, वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे मोर्चे आंदोलन, वेगवेगळ्या मिरवणुका, वेगवेगळ्या जयंत्या या सर्व बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस बांधवावर असते. त्यामुळे सण आहे काय आणि नाही काय..? त्यांना कसलाच फरक पडत नाही. नवरात्रीच्या नऊ दिवसात घरोघरी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करणाऱ्या महिला दिसतात. मात्र आमच्या पोलीस भगिनी एकाच रंगाची साडी घालून आपली सेवा बजावत असते अशा परिस्थितीत सरकारने शासकीय सेवेतील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला, मात्र पोलिस बांधवांना यापासून वंचित ठेवले. त्यामुळे राज्यातील सर्व पोलिसांना एक महिन्याचा पगार दिवाळीचा बोनस म्हणून द्यावा, अशा मागणीचे निवेदन पोलिस बॉयिज असोसिएशन नागपूर या संघटनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना दिले असून बोनस न दिल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
यावेळी प्रमोद वाघमारे संस्थापक अध्यक्ष, राजेश ढोरे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष, पवन दामले ग्रामीण अध्यक्ष, चंकी पांडे नागपूर शहर अध्यक्ष, राहुल दामोधर सह अनेक कार्यकर्ते या धरणे आंदोलनात उपस्थित होते.

