मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सतत वाईट स्वप्न पडत असल्यामुळे या वाईट स्वप्नांना कंटाळून तरुणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याने सर्विकडे एकच खळबळ उडाली आहे. विशाल विश्वास कडवे वय 22 वर्ष, मूळगाव रा. वालवे, ता. साक्री, जि. धुळे असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्वास महिमाजी कडवे यांनी नंदूरबार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होता. तो ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता कंपनीतून घरी आला. त्यानंतर झोपला होता. त्याला वाईट स्वप्न पडत होती. वाईट स्वप्नांना कंटाळून त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही बाब त्याचे वडील विश्वास कडवे यांना समजली. ते तात्काळ नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी विशाल यास ५ ऑक्टोबर रोजी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा ७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी नंदूरबार पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पानसरे हे करीत आहेत.