मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी दहा लाख रुपयांची खंडणी घेऊनही घरावर दगडफेक करून दहशत पसरविणार्या सात जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार विक्रम सुदाम नागरे वय 39, रा. इंदू पॅलेस, अशोकनगर, सातपूर यांना आरोपी दीपक भास्कर भालेराव व रोशन हरदास काकड यांनी संगनमत करून नागरे यांना त्यांच्या पिंपळगाव बहुला-वासाळी रोडवर, तसेच सातपूर येथील घराजवळ अडवून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन दि. 1 जानेवारी 2020 ते 30 ऑक्टोबर 2022 यादरम्यान वेळोवेळी 10 लाख रुपयांची खंडणी उकळली.
खंडणी घेतल्या नंतर देखील आरोपी दीपक भालेराव, रोशन काकड, गणेश अशोक लहाने, गौरव उपर गुलब्या घुगे, अनिरुद्ध शिंदे सर्व रा. पिंपळगाव बहुला, ता. जि. नाशिक, संजय जाधव रा. आनंदछाया बस स्टॉप, सातपूर कॉलनी, नाशिक जया दिवे रा. पंचवटी, नाशिक यांनी नागरे यांच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमवून दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरावर दगडफेक केली.
तसेच अशोकनगर भाजी मार्केट येथे फिर्यादीने लावलेल्या पोस्टरवरदेखील दगडफेक करून पोस्टर फाडून नुकसान केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नागरे यांच्या फिर्यादीनुसार सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण करीत आहे.

