✒️प्रशांत जगताप, संपादक
हिंगणघाट:- खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी आमदार राजू तीमांडे यांच्या नेतृत्वात नंदोरी चौक हिंगणघाट येथे जोरदार घोषणाबाजी करत ‘जोडे मारा आंदोलन’ करण्यात आले. सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना राकपा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले म्हणाले, “महिलांच्या बद्दल आदर नसणारी लोक आज शिवरायांच्या महाराष्ट्राचा गाडा हाकत आहे ही, आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्री मंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल! अब्दुल सत्तार सारख्या बेताल वक्तव्य करत महाराष्ट्रातील वातावरण बिघडवणाऱ्या वाचाळवीरांचा बंदोबस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नक्की करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
अब्दुल सत्तार यांच्या फोटोला मारले जोडे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचावर अत्यंत अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्यामुळे महिला आघाडी तर्फे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फोटोला चप्पल आणि जुते मारण्यात येऊन निषेध केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

