विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील जवळपास 18 ते 20 हजार पदवीधर व्यक्तींनी घरबसल्या ऑनलाईन मतदार नोंदणी केली आसुन या व्यक्तींच्या मूळ कागदपत्रकांची घरी जाऊन पडताळणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे 3 हजार 722 मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना बीएलओ आता घरोघरी जाऊन अर्जासोबत जोडलेल्या मूळ कागदपत्रांची तपासणी करुन मतदारांची ओळखपरेड घेणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची फेब्रुवारी 2023 मध्ये मुदत संपत आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीची पूर्वतयारी सुरु आहे. पहिल्यांदा नवीन मतदार नोंदणीचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून ऑफलाईन मतदार नोंदणी सुरु झाली. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास अनुमती दिली. मतदार नोंदणीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 7 नोव्हेंबर होती.
नोकरी व इतर कार्यबाहुल्यामुळे जिल्ह्यातील 18 ते 20 हजार पदवीधर व्यक्तींनी घरबसल्या ऑनलाईन मतदार नोंदणी केली. 18 नंबर अर्जाबरोबर त्यांनी आधारकार्ड, पदवी प्रमाणपत्र वा गुणपत्रक, स्वत:चे छायाचित्र आदी कागदपत्रके ऑनलाईन अपलोड केलेली आहेत. या अर्जाबरोबर असलेली कागदपत्रके खरी आहेत का, अर्ज करणारी व्यक्ती तीच आहे का, मतदार अर्जावर अर्जदार व्यक्तीचीच सही आहे का आदीची पडताळणी संबंधित अर्जदाराच्या घरी जाऊन करणे आयोगाने बंधनकारक केले आहे.
त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना आता आपापल्या मतदान केंद्रावरील पदवीधर व्यक्तींच्या घरी हेलपाटे मारावे लागणार आहेत. घरी जाऊन अर्जासोबत जोडलेली मूळ कागदपत्रके तपासावी लागणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ओके म्हटल्यानंतरच संबंधित अर्जाची मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे.
मतदारसंख्या 85 हजारांवर जाणार
फेब्रुवारी 2017 मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती. त्यावेळी मतदारसंघात एकूण 2 लाख 53 हजार मतदार होते. यामध्ये नगर जिल्ह्यातील 85 हजार मतदारांचा समावेश होता. नवीन मतदार नोंदणीला शेवटच्या तीन-चार दिवसांत वेग आला. त्यामुळे ऑफलाईन प्रक्रियेत 45 हजारांवर अर्ज दाखल झाले. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत आणखी अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे यंदा देखील 85 हजारांवर मतदार असण्याची शक्यता आहे.

