महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर/बोटा:- जाचकवाडी ता. अकोले येथे झालेल्या गुन्ह्याची उकल पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात केली. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. संगमनेर- अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर जाचकवाडी शिवारात कांद्याच्या पैशाच्या देवाण घेवाणवरून याच गावात राहणार्या भाऊसाहेब ऊर्फ बारकू महाले रा.
जाचकवाडी ता. अकोले आणि अशोक बाळशिराम फापाळे रा. बेलापूर या दोघांनी मिळून संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे राहत असणारा अंकुश रानु लामखडे वर्षे 57 या सावकाराच्या गळ्याला मफलरने आवळून डोक्यात फावड्याने वार करून ठार केले होते.
या खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने टोमॅटोच्या फडात बांधाच्या कडेला तीन फूट खड्डा खोदून त्यास पुरले होते. मात्र त्याची चप्पल रस्त्यावर तशीच पडून राहिली व मोटारसायकल उसात लपवली होती. रस्त्यावर पडलेली चप्पल वाट सरूंना दिसली. यातूनच या खून प्रकरणाचे खर्या अर्थाने गूढ उलगडले. या सावकाराचे कोणाशी वाद झाले. याबाबत घारगावचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पो. हे. काँ. कैलास देशमुख तसेच अकोल्याचे सहाय्यक पो. नि. मिथुन घुगे हे माहिती घेत असताना पोलिसांना भाऊसाहेब ऊर्फ बारकू महाले आणि अशोक फापाळे या दोघांची नावे समजली. यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले होते.
घारगावचे पो. नि. सुनील पाटील आणि अकोलेचे सहाय्यक पो. नि. मिथुन घुगे हे त्या दोघा मारेकर्यांना सोबत घेऊन टोमॅटोच्या शेतात सावकाराचा मृतदेह गाडला, त्या ठिकाणी घेऊन गेले. बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास मृतदेह उकरून काढला. पंचनामा करुन, पुढील तपा सणीसाठी लोणी येथे पाठविण्यात आला आहे.
याबाबत मृत अंकुश लामखडे या सावकाराचा मुलगा नितीन अंकुश लामखडे यांच्या फिर्यादी वरून अकोले पोलिसांनी भाऊसाहेब ऊर्फ बारकू महाले आणि अशोक फापाळे या दोघांवर खुनासह पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करुन, दोघांना अटक केली आहे. या खुनाचे हे रहस्य उलगडताच परिसरामध्ये चर्चेस उधान आले होते. पोलिसांनी तपास लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकोले चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.
मारेकर्यांना पाच दिवस पोलिस कोठडी
अकोले तालुक्यातील जाचकवाडीचा भाऊसाहेब ऊर्फ बारकू महाले व अशोक फापाळे या दोघांनी मिळून अंकुश लामखडे या सावकाराचा खून केला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या खुनाचा उलगडा केला आणि दोघांना अटक केली. या दोघा आरोपींना पोलिसांनी अकोले न्यायालयात काल गुरुवारी हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

