हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट : जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकूल बॅटमिंटन हॉल गेट येथून सायकल रॅलीला सुरवात होणार असून मित्रनगर, केवलराम चौक, सेंट मायकल स्कूल, जटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, परत जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवासस्थान आणि जिल्हा क्रीडा संकूल येथे समारोप होणार आहे.
सदर रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सायकल क्लब, विविध क्रीडा मंडळे, नागरिक, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, क्रीडाप्रेमी यांनी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकूल येथे सायकलसह उपस्थित राहावे. रॅली दरम्यान मुलांना फुड पॅकेट, पिण्याचे पाणी आयोजन समितीमार्फत देण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
सायकल रॅलीची सुरवात आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यशस्वी करण्याकरीता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

