मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- महाराष्ट्र शासनाने गेल्या आठवड्यात नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची केलेली बदली रद्द करण्यात आली आहे. तर सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. शासनाने तसे नवीन आदेश जारी केले आहेत. मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली रद्द करण्यात आल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा करण्यात येत आहेत.
सहसचिवांनी काढला होता बदली आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहसचिवांनी गेल्या आठवड्यात राज्यातील 36 पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या, यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांची बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शेखर यांची पदस्थापना करण्यात आली नव्हती. दरम्यान शनिवारी शासनाने नव्याने बदलीचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये फुलारी यांना कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नव्याने बदली आदेश दिले आहेत. तर शेखर यांची बदली रद्द केली आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बी. जी. शेखर हे कायम राहणार आहेत.
अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. अंकुश शिंदे हे याआधी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त होते. एप्रिल महिन्यात आयपीएस कृष्णप्रकाश यांच्या जागी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली होती. अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत अंकुश शिंदे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत अनेकांचे धाबे दणाणून सोडले होते. अंकुश शिंदे हे 2016-17 मध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. येथूनच त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली होती. शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल झाली होती. आता शिंदे यांनी नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला असून स्ट्रीट क्राइम आणि शहराच्या वाहतुकीला शिस्त लावणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348