✒️प्रविण जगताप हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सामान्य नागरिकांची प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर तातडीने कार्यवाही व्हावी व नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी निवेदने, अर्ज स्विकारले जाणार असून ती जलदगतीने निकाली काढली जाणार आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई येथे नागरिकांची निवेदने, अर्ज प्राप्त होत असतात. या सर्व अर्ज, निवेदनांवर कारवाईसाठी ते संबंधितांना विभाग व जिल्हास्तरावर पाठविले जातात. विभागस्तरावरच असे अर्ज स्विकारून कार्यवाही करण्यासाठी विभागियस्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याच धर्तीवर आता जिल्हास्तरावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एक नायब तहसिलदार व सामान्य शाखेतील एका लिपिकाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न, शासन स्तरावरील कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्विकारले जाणार आहे.
नागरिकांच्या ज्या निवेदने, अर्जांवर राज्यस्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी वैयक्तिक, धोरणात्मक, अर्ज, संदर्भ व निवेदने मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयातील अपर मुख्य सचिव यांना पाठविली जाणार आहे. या कक्षाच्या स्थापनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहे. या कक्षात प्राप्त होणाऱ्या अर्ज, निवेदनांचा प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.