पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे:- दि. २९/१२/२०२२ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत सुस खिंड येथे निर्जन स्थळी एका अनोळखी इसमाचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालुन खुन केल्याची माहिती प्राप्त झाली. सदर खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन आरोपींना अटक करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी युनिट ४ कडील तपास पथक तयार करून मयताची ओळख पटवुन, आरोपींना निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व सुचना देऊन तपास पथक रवाना केले.
मयताचे डोक्यात दगड घातल्याने त्याचा चेहरा ओळखीस येत नव्हता, तसेच त्याची ओळख पटविण्या योग्य कोणतेही कागदपत्र अथवा इतर ठोस माहिती उपलब्ध नव्हती तरीदेखील युनिट ४ कडील अधिकारी व अंमलदार यांनी बाणेर परिसरात मयताची माहिती घेणेकरीता परिसर पिंजून काढला. पोउपनि जयदीप पाटील व पोलीस अंमलदार अजय गायकवाड हे मयताची माहिती घेत असताना त्यांना एका इसमाकडुन मयताची अचुक माहिती मिळाली. सदर मयताचे नाव संदिप शंकर शिंपी असे समजले. त्यांनतर तपास पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय व सखोल चौकशीद्वारे दि. २८/१२/२०२२ रोजी संदिप शिंपी यास दोन इसमांनी बुलेट मोटार सायकलवर बसवुन नेताना पाहिल्याची माहिती मिळवली.
सदर माहितीच्या आधारे म्हाळुगे पुणे येथून दोन संशयित इसमाना चौकशीकामी ताब्यात घेतले. सदर संशयितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता १) सतिश रामभाऊ गि-हे, रा. सचिन पाडळे चाळ, शितलादेवी मंदिराजवळ, म्हाळुंगे, पुणे २) दिपक विठ्ठल कोळेकर, रा. पॅनकार्ड क्लब रोड, चाकणकर चाळ, बाणेर पुणे या दोघांनी मिळुन संदिप शिंपी याचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची कबुली दिली. आरोपींना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता संदिप शिंपी हा त्याच्या बायकोला दारु पिऊन सतत मारहाण, शिवीगाळ करीत असे. तसेच त्याच्या बायकोचा भाऊ (मेहुणा) आरोपी सतिश जिन्हें यास व त्याच्या घरच्यांना दारुच्या नशेत शिवीगाळ दमदाटी करीत असे. याकारणामुळे वैतागुन त्यास निर्जन स्थळी नेऊन त्याचे डोक्यात दगड घालुन खुन केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपी दिपक कोळकर हा आरोपी सतिश गि-हे याचा साडु भाऊ असल्याचे चौकशीत समजले,
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमोल झेंडे. मा. सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, सारस साळवी यांनी मा, वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे केली आहे.