✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- विधानसभेच्या नागपुर विभाग शिक्षण मतदार संघासाठी दि. 30 जानेवारी रोजी जिल्ह्यात 14 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. मतदान संपल्यानंतर मतपेट्या नागपुर येथे पाठविण्यापुर्वी वर्धा येथे जमा करून घेतल्या जाणार आहे. या पेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंगरूम तयार करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज या रुमची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता आचार्य, अभियंता अमोल साटे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार अतुल रासपायले आदी उपस्थित होते. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 30 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सदर मतदानाची प्रक्रिया जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रावर राबविण्यात येणार आहे. निवडणूक साहित्याचे वितरण व साहित्य स्वीकृती जिल्हा क्रीडा संकुल येथील कॉम्प्लेक्स मधून होणार आहे.
मतदानाच्या प्रक्रियेनंतर मतदान प्रक्रिया झालेल्या मतपेट्या जिल्हा क्रीडा संकुल येथील तात्पुरत्या सुरक्षा कक्षात जमा करण्यात येतील. सर्व 14 मतदान केंद्रांच्या मतपेट्या व साहित्य जमा झाल्यानंतर सदरच्या मतपेट्या नागपूर येथील सुरक्षा कक्षात त्याच रात्री पाठवण्यात येणार आहेत.
मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजतापर्यंतची आहे. त्याअनुषंगाने स्ट्रॉंगरूम तयार करण्याच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. वर्धा शहरातील भरत-ज्ञान मंदिरम व लोक विद्यालय व लोक महाविद्यालय येथील मतदान केंद्रांची देखील पाहणी त्यांच्याकडून करण्यात आली. मतदान केंद्रावर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करून घेतली.