बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप नोंदवला आहे.
✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई,17 जाने:- शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे पुरावे समोर आले आहे. शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांनी नुकताच निवडणूक आयोगासमोर आम्ही सादर केलेला कागदपत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेतं? हे दोन्ही गटाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या एफिडेव्हिटमध्ये माजी विरोधी पक्ष नेता म्हणून विजय चौगुले यांचं नाव आहे. मात्र, शिंदे गटाने सादर केलेल्या खऱ्या शिवसेनेचा दावा केलेल्या यादीत ते जिल्हाप्रमुख म्हणून दाखवण्यात आले आहेत. अशी अनेक नावे या यादीत असल्याचा ठाकरे दावा गटाने केला आहे. यावर निवडणूक आयोगात आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरे गटाने 7 जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेतले आहेत. राजाभाई केणी, तालुकाप्रमुख पदावर असताना रायगडचे जिल्हाप्रमुख दाखवले. राम चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यांना नंदुरबारचे जिल्हाप्रमुख दाखवले. किरसिंग वसावे, माजी परिषद सदस्य असताना नंदूरबारच जिल्हाप्रमुख दाखवले. नितीन मते माजी जिल्हाप्रमुख असताना चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख दाखवले. दत्तात्रय साळुंके, जिल्हा समन्वयक असताना धाराशीवचे जिल्हाप्रमुख दाखवले. तर सुरज साळुंखे, युवा सेना राज्य विस्तारक असताना धाराशीव जिल्हाप्रमुख दाखवले.
दरम्यान, मागील आठवड्यात 10 जानेवारी मंगळवारी यावर दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद झाला होता. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आला होता. तर सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षावर निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान केली होती.
तर, अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नाही. धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही. आमदार, खासदारांची आमच्याकडे जास्त संख्या आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. सर्व निकषांवर शिंदे गटच सरस आहे. शिवसेनेची जुनी घटना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतलं मात्र ते शिवसेनाप्रमुख होत नाहीत बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव यांनी स्वतःकडे अधिकार घेतले. शिवसेनेच्या घटनेत उद्धव यांनी केलेला बदल बोगस आणि बेकायदेशीर आहे, असा दावा शिंदे गटाने केला होता.