छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर:- येथून एक खळबजनक माहिती समोर आली आहे. येथील एका सरपंचाने गटविकास अधिकारी यांच्या वर लाच खोरीचा आरोप करून आगळ वेगळ आंदोलन करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली.
शासकीय योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 12 टक्के लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने शुक्रवारी दुपारी फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालयासमोर चक्क दोन लाख रुपयांची उधळण केली.
गळ्यात शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल अडकवून आलेल्या या सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने संताप व्यक्त करीत आंदोलन केले. या सरपंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर, या आंदोलनाची दखल घेत, येथील बीडीओवर कारवाई करण्यात आलीय.
राज्यसरकारने सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. सरकारने केलेल्या कारवाईचं सरपंच मंगेश साबळे यांनी स्वागत केलंय. तसेच, मी उधळलेले पैसेही त्या महिला अधिकाऱ्यांकडून वसुल करुन, मला परत करावेत, अशी मागणीही आपण संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचं साबळे यांनी म्हटलंय. कारण, मी उधळलेला पैसा हा शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा आहे, असंही ते म्हणाले.
सरपंचाचे काय म्हणणे आहे?
सरपंच मंगेश साबळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात विहिरीचे 20 प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के रक्कम मागत आहेत. म्हणून शुक्रवारी 2 लाख रुपये घेऊन आलो; पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यामुळे मी या नोटा उधळल्या.