मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- राज्यात आणि जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आता पण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने १९ धरणांमधून विसर्ग करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या जलसाठयाचा विचार करता यंदा ३७ टक्के अधिक जलसाठा आहे. मराठवाडयातील जायकवाडी धरण १०२ टीएमसी क्षमतेचे आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे तब्बल ६४ टीएमसी पाणी प्रवाहित झाले आहे.
जूनमध्ये प्रतीक्षा करायला लावणार्या पावसाने जुलैत संपूर्ण कसर भरून काढली. तेव्हापासून आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. यामुळे वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महिनाभरात इतका पाऊस झाला की, बहुतांश धरणे तुडुंब होऊन त्यातून अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात सध्या ५३३७ दशलक्ष घनफूट (९५ टक्के) जलसाठा झाला आहे. याच धरण समूहातील काश्यपीत (९९), गौतमी गोदावरी (९९), आळंदी (१००) असा जलसाठा आहे. पालखेड (६९), करंजवण (८३), पुणेगाव (९१), दारणा (९८), मुकणे (९८), कडवा (९०), चणकापूर (७८), गिरणा (९२), पुनद (८२) आणि माणिकपुंज धरणात (७१) टक्के जलसाठा आहे. वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे कधीच तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या ६० हजार ९३१ दशलक्ष घनफूट (९३ टक्के) जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रमाण ५७ टक्के होते.