मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
नव महिन्याची गर्भवती महिलेला अचानक प्रसुती कळा यायला सुरुवात झाली. तिला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा आणली रिक्षा रुग्णालयाच्या दिशेने निघाला पण रस्त्यावरील खड्डे दुश्मन बनून पडून होते. त्यामुळे तिची प्रसुती भर रस्त्यात रिक्षातच झाली. रिक्षात प्रसूती झालेल्या महिलेच्या पतीने धावतपळत सांताक्रूझ मधील व्ही. एन. देसाई रुग्णालय गाठले. तिथे त्वरित आई अन् नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दाखल केल्यामुळे त्याच्यावरील संकट टळलं.
प्राप्त माहितीनुसार, रमेश यादव हे सांताक्रूझमधील शास्त्रीनगर परिसरामध्ये राहतात. यादव यांच्या एका अपत्याचा जन्मानंतर काही दिवसात मृत्यू झाला होता. यामुळे गावात सुविधा राहत नसल्यानं ते दुसऱ्या बाळाच्या प्रसुतीसाठी गावातून शहरात म्हणजेच मुंबईत आले. परंतु शहरात तर गावासारखाच अनुभव त्यांच्या नशिबी आला.
गावात वैद्यकीय सुविधा नसलेल्या गावी पत्नीचे बाळंतपण केल्यामुळे आपले मूल दगावल्याची सल त्यांच्या मनात कायम घर करून गेली. यामुळे ते दुसऱ्या बाळंतपणासाठी मुंबईत आले, जेणेकरुन काही अडचण आली तर त्वरित वैद्यकीय उपचार घेता येतील. यादव राहतात त्या शास्त्रीनगर येथून रुग्णालय गाठण्यासाठी दहा ते बारा मिनिटांचा अवधी लागतो. मात्र सध्या रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तिप्पट वेळ लागत आहे. कळा सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा घेतली. परंतु रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांचा जिव टांगणीला लागला होता.
रस्त्यातील खड्डे चुकवत वाहतुक कोंडीमधून मार्ग काढत येणाऱ्या यादव यांच्या जिवाची घालमेल होत होती. दहा मिनिटात रुग्णालयात पोहचता येणाऱ्या अंतर कापण्यासाठी त्यांना चाळीस मिनिटे लागली. परंतु पत्नीला कळा असह्य झाल्याने त्यांच्या पत्नीची अखेर भर रास्त्या वर रिक्षामध्येच प्रसूती झाली. त्यानंतर पटकन घाई करत यादव यांनी बाळ व आईला घेऊन ते रुग्णालयामध्ये नेले, तेव्हा डॉक्टरांनी त्वरित बाळाला अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले. बाळाला नीट श्वास घेता येत नव्हता. आता मात्र बाळाची प्रकृती ठीक असल्याचे यादव यांनी सांगितले.