मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
औरंगाबाद:- आज सर्वत्र बळीराजाचा बैल पोळ्याचा सण आनंदात साजरा होत आहे. मात्र, फुलंब्री तालुक्यातून पोळ्याच्या दिवशी एक हृदय हेलवणारी घटना समोर आली आहे.
बळीराजाच्या पोळ्याचा सणासाठी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंढरीनाथ कचरू काळे वय 33 वर्ष आणि रितेश अजिनाथ काळे वय 18 वर्ष अशी मृतक काका पुतण्याची नावे आहेत. हे दोघेही पोळ्याच्या सणानिमित्याने बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाझर तलावाच्या काठावर घेऊन गेले होते. मात्र, बैलाने धक्का दिल्याने काका पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला पुतण्या देखील पाण्यात बुडाला. फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे ही दुर्दैवी घटना घडली. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांचा पूजनाचा दिवस म्हणजे बैलपोळा. या सणाची शेतकरी वर्गात आठ दिवसांपूर्वी पासूनच लगबग सुरु असते. पंढरीनाथ यांनी देखील पोळा असल्याने त्यांचे दोन्ही बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावात आणले होते. मदतीला पुतण्या रितेशला सोबत आणले होते. तलावच्या काठावर दोन्ही काका पुतणे बैलांना धुत होते.
दरम्यान त्यातील एका बैलाने त्यांना जोराचा धक्का दिला. जोरदार धक्क्याने पंढरीनाथ यांच्या हातातील बैलांची दोरी सुटली आणी ते तलावच्या पाण्यात पडले. काका बुडत असल्याचे पाहून पुतण्या रितेशने देखील वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.मात्र दोघेही पाण्यात बुडाले. ही बाब कळतच इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णाल्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून दोन्ही काका पुतण्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.