हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- तालुक्यातील कोठारी पोलीस स्टेशन हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तोहोगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाचगाव येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेले पत्रू वलसू टेकाम वय ४५ वर्ष यांचा मृतदेह गुरुवारी तोहोगाव येथील गिरिधर धोटे यांच्या शेतात पुरलेल्या अवस्थेत सायंकाळी आढळून येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
पत्रू टेकाम यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते १९ नोव्हेंबरला रात्री दोन वाजेच्या सुमारास घरून निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. पण, ते सापडत नव्हते. याबाबत कोठारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवार, २३ नोव्हेंबरला गिरिधर धोटे यांच्या शेतात मृतदेह गाडला गेला असल्याची कुजबुज नातेवाइकांना लागताच धोटे यांच्या शेतात जाऊन नातेवाइकांनी संपूर्ण शेत पिंजून काढले असता कापसाच्या शेतात मृतदेह गाडलेला असल्याचे व मृतदेहाचे हात जमिनीच्या वर दिसून आले. नातेवाइकांनी लगेच तोहोगावच्या पोलीस पाटलांना याबाबतची माहिती दिली असता त्यांनी घटनेबाबत कोठारी पोलिसांना कळविले. कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड, गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पुरलेला मृतदेह बाहेर काढला. नातेवाइकांकडून मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा करण्यात आला. मृतदेह कुजलेला असल्याने गोंडपिपरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी यांना पाचारण करून शेतातच उत्तरीय तपासणी करण्यात आली व मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. कोठारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेतमालक गिरिधर धोटे याला अटक केली आहे.
पाचगाव येथील पत्रू टेकाम यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने रात्री शेतशिवारात ‘भटकत असताना जिवंत वीज प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाले. शेतशिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस असून शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे व पिके रानडुक्कर फस्त करीत असल्याने शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी झटका मशीन किंवा विद्युत प्रवाह लावत असतात. त्याच विद्युत प्रवाहाने पत्रूचा मृत्यू झाला व बिंग फुटू नये, म्हणून मृतदेहाला जमिनीत पुरले. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक नऊ वर्षीय मुलगी व एक सात वर्षीय मुलगा आहे.