मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात नक्षलवाद्यांनी पुन्हा रक्तपात सरू केला असून त्यामुळे दक्षिण गडचिरोली नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. नक्षलवाद्यांनी आता पर्यंत अनेक तरुणाची हत्या केली आहे. त्यात दक्षिण गडचिरोली भागात महिनाभरात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याचे समोर येत आहे.
पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी आणखी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (२७, रा. कापेवंचा ता. अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून घटनास्थळी आढळलेल्या नक्षल पत्रकात तो खबऱ्या असल्याचा दावा केला आहे. दक्षिण गडचिरोली भागात महिनाभरात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कापेवंचा येथील रहिवासी असलेला रामजी हा तरुण आपल्या शेतात काम करीत होता. दरम्यान, संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्याठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी रामजीची हत्या केल्याचा दावा नक्षल्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात केला आहे. मात्र, तो खबरी नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तपासानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
महिनाभरात दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांनी तिघांची हत्या केली आहे. १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा आणि शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम या तरुणाची हत्या केली. तोडगट्टा येथील खाणविरोधी आंदोलन प्रशानाकडून उधळून लावण्यात आल्यानंतर नक्षलवादी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मागील दोन वर्षांपासून शांत बसलेले नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र असून लागोपाठ घडवून आणलेल्या हत्यासत्राने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348 / 9766445348