राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली. पण महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना ठाकरे पक्षाने मोट बाधलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गदारोळ अजून संपलेला नसल्याचे अधिकृत उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाहीत. त्यात वंचित बहुजन आघाडीचा अजून पर्यंत निर्णय झाला नसल्याने आघाडीत पेच निर्माण झाला आहे.
पण राज्यात महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेली काँग्रेस राज्यात 16 लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी करीत असताना, वंचित बहुजन आघाडीने मात्र त्यांना केवळ 7 जागांवर पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे. अशी माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार, दि.19 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना तसे पत्र पाठवले आहे. तसेच ठाकरे आणि पवार गटावरील विश्वास उडाल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
“लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे. शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आहे.
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हा फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे. या विचाराने मी महाराष्ट्रातील 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे आंबेडकर यांनी पत्रात लिहिले आहे.
काँग्रेसकडे दिला युतीसाठी प्रस्ताव: “मी तुम्हाला विनंती करतो की, मला महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे ग्राउंडवर आणि धोरणात्मक पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे”, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.
थेट काँग्रेसशी चर्चा सुरू: दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीतले नेते वंचितबाबत सकारात्मक असल्याचं सातत्याने सांगितलं जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी नुकतंच सांगितलं आहे की महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला राज्यातल्या लोकसभेच्या चार जागा देण्यास तयार आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे पवारांना डावलून थेट काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे.