उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यात अकोला या जागेची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. अकोला मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार प्रचार सभा सुरू आहे. मलकापूर येथील क्रांतीचौक येथे आयोजित प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी सह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 400 पेक्षा जास्त जागेवर आम्ही येवू या अहंभावात भाजपा आहे. मात्र ते 150 च्या वर सुद्धा जाणार नाहीत ही वस्तूस्थिती आहे. भाजपचा संविधान बदलायचा डाव आहे. त्यासाठी त्यांनी खटाटोप सुरु केला आहे.
नरेंद्र मोदी हा एक नंबरचा लबाड माणूस असून स्वतःशी प्रामाणिक नसणारा माणूस जनतेशी कसा प्रामाणिक असेल असा सवाल उपस्थित करीत मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा अकोला लोकसभेचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
बुधवारी 17 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता क्रांतीचौक मलकापूर अकोला येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टिकाही केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अकोला लोकसभा मतदारसंघातच नव्हेतर संपूर्ण राज्यात देशात विकासाचा आव आणला जात आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जनतेने आता भाजपाचा डाव ओळखला पाहिजे. स्वतःला वाचवण्यासाठी इतरांचा बळी घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करीत आहे.
नरेंद्र मोदी यांची भूमिका हिटलरसारखी असून त्याचपद्धतीने त्यांची वाटचाल आहे. मोदींना थांबवण्याची हीच वेळ असून लोकसभा निवडणूकीत भाजपाला त्यांची जागा दाखवा असे आवाहनही वंचित बहुजन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. त्यांनी भाजपाविरोधात स्वतः बंड पुकारला असून लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी राहण्याची अपेक्षा ॲड. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.
या प्रचार सभेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, दामोदर जगताप, किरण बोराखडे, शेख साबीर, मायाताई इंगळे, वैशाली सदांशिव, किशोर बळी, पराग गवई, दिपक गवई, बबलु पातोडे, बाबाराव दंदी, सचिन इंगळे, सुवर्णा जाधव, अविनाश वानखडे, विकास सदांशिव यांच्यासह बारा बलुतेदार व अठरापगड जातीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.