पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे हत्येचा गुन्ह्याच्या आरोपी असलेल्या शेख अमजद शेख शब्बीर वय 28, रा. टेका नाका, पाचपावली याला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालय परिसरात भेटीसाठी आलेल्या पत्नीने विष दिल्याची घटनेने संपूर्ण न्यायालयात खळबळ माजली आहे.
शेख अमजद शेख शब्बीर हा आरोपी बेशुद्ध होऊन तोंडातून फेस येत असल्याचे लक्षात येताच ही घटना समोर आली आहे. ही घटना दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी समय सूचकता दाखवत आरोपीला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर शहरातील यशोधरा नगर येथील माजरी परिसरात असलेल्या फरदिन सेलिब्रेशन लॉनजवळ 17 मे रोजी यश गोणेकर वय 21, कपिलनगर या ओला कॅबचालकाची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी आरोपी शेख अरबाज शेख इकबाल आणि असलम ऊर्फ गुड्डू मकसूद अन्सारी यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
मात्र, या प्रकरणात शेख अमजद शेख शब्बीर हा फरार होता. यशोधरानगर पोलिसांनी त्याला गुरूवारी रात्री 1.30 वाजताच्या सुमारास पार्वती नगर येथून अटक केली. विशेष म्हणजे, या प्रकरणात आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.
काय आहे ही घटना.. दिनांक 7 जून शुक्रवारी शेख अमजद याची पोलिस कोठडी मिळण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास आणण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात त्याची पत्नी आयेशा आणि परिवार उपस्थित होता. शेख अमजद येताच, त्याची पत्नी आयेशा त्याला भेटण्यासाठी आली. तिने त्याच्या हातात ‘जल्लाद, जालिम जहर’ नावाची विषाची छोटी बाटली दिली.
त्यानंतर पोलिस त्याला नेत असताना अगदी दारात तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्याच्या तोंडून फेस निघत असल्याने त्याला तत्काळ यशोधरानगर पोलिसांनी मेयोत दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. विशेष म्हणजे, अचानक घडलेल्या प्रकाराने त्याच्यासोबत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यां सोबतच न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनाही धक्का बसला.
गुढ कायम: शेख अमजद शेख शब्बीर हा कुख्यात गुंड असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत. त्याने आपल्या साथीदारासह जुन्या भांडणातून यश गोणेकर या कॅबचालकाची हत्या केला होती. एक महिन्यापासून तो फरार होता. गुरुवारी रात्री त्याला अटक करीत सकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करीत त्याच्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर पत्नी त्याला भेटली आणि तिने विष दिले. मात्र, अचानक पत्नीने त्याला विष का दिले ? हा प्रश्न अनुत्तरित असून पोलिस याचा तपास करीत आहेत.