महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- हरिद्वार जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील भाजप नेत्यावर एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केल्यानंतर तिच्या बरोबर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मुलीचा मृतदेह महामार्गाच्या कडेला पडला होता. मृत मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.
हा प्रकार हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद परिसरातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी भाजप नेते आणि ओबीसी आयोगाचे सदस्य आदित्यराज सैनी यांच्यासह दोन लोकांविरुद्ध कलम 2363, 366, 120 (बी), 376 (ए), 376 (डी) आणि 5 (जी) 6 पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बहादराबाद पोलिसांना सोमवारी पहाटे 4.45 वाजताच्या सुमारास हरिद्वार-दिल्ली महामार्गाच्या किनारी एका मुलीचा रक्कबंबाळ अवस्थेतील मृतदेह मिळाला. मुलीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले की, 23 जूनच्या सायंकाळी अमित सैनी अल्पवयीन मुलीला घेऊन गेला होता. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू केली. तिच्या नंबरवरती फोन केल्यानंतर कॉल अमित याने उचलला. त्याने सांगितले की, काही वेळात मुलगी घरी येईल मात्र काही वेळानंतर फोन बंद केला.
मुलीच्या आईने मंगळवारी अमितचे नातेवाईक व मागासवर्ग आयोगाचे सदस्य आदित्यराज सैनी यांना भेटून मदत मागितली. मुलीच्या आईने आरोप केला आहे की, अमित गेल्या सहा महिन्यापासून प्रेमाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करत होता. अमित आणि आदित्यराजने सामूहिक बलात्कार करून मुलीची हत्या केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. आदित्यराज भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत होता.
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर भाजप नेते आदित्यराज सैनी यांच्या अडचणी वाढू शकतात. मंगळवारी दुपारी कडक सुरक्षा व्यवस्थेत गावातील स्मशानभूमीत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राथमिक तपासात अजूनपर्यंत कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत. गावाला पोलीस छावणीचे रुप आले आहे. मंगळवारी सकाळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. त्यांनी या प्रकरणात कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची संवेगनशीलता पाहून डॉक्टरांच्या पथकाने व्हिडिओग्राफी करत अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले गेले. तीन डॉक्टरांच्या पॅनलने मृतदेहाचे पोस्टमार्टम केले.