भ्रष्ट तलाठी राजेश शेळके निलंबित, लाडक्या बहिणींचा श्राप भोवला..
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला दि.3:- ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी प्र बाळापूर येथील तलाठी राजेश शेळके यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी महिलांकडून मोठी उमरी येथील तलाठी पैसे घेत असल्याची बातमी व व्हिडीओ काही माध्यमांतून प्रसिद्ध झाला. यासंबंधी तलाठ्यांना तत्काळ नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यांनी अद्याप खुलासा सादर केला नाही. त्यांच्या दप्तराची तपासणी करण्यात आली, तसेच साझ्याचे ठिकाणी ८ नागरिकांचे बयाणही घेण्यात आले. तलाठ्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी 30 रूपयाची मागणी केली, असे बयाण नागरिकांनी दिले.
दप्तर तपासणीत गाव नमुना 1 च्या नोंदी गाव नमुना 5 शी न जुळणे, नमुना 1 अ 1 ईपर्यंत अद्ययावत नसणे, गाव नमुना 2 ई-चावडीत अद्ययावत नसणे, फेरफार प्रलंबित असणे, त्यात विसंगती आढळणे, ई-चावडीमधील नमुना ६ ड निरंक असणे, नमुना 15 मध्ये नोंदी नसणे, दप्तरात दैनंदिनी, कार्यालयात आदर्श तक्ता नसणे आदी अनेक त्रुटी आढळून आल्या.
शासकीय कामात हलगर्जीपणा, सचोटी न राखणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार तलाठी राजेश शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी ही कारवाई केली.