बल्लारपूर येथे अजय दुबे यांच्या वाढ़दिवसा निमित्य कामगार स्नेहसंमेलन थाटात संपन्न.
हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर, दि.१२:- देशातील महत्त्वाचे शहर म्हणून बल्लारपूरची ओळख आहे. देशातील बल्लारपूर मध्ये छोटा भारत वसलेला आहे. या शहराच्या शिक्षण, आरोग्य, रोजगारासह सर्वांगिक विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बल्लारपूर शहरातील सुभाष टॉकीत बसस्टॉप जवळील सभागृहात आयोजित अजय दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कामगार स्नेह संमेलनात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, आयोजक अजय दुबे, प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, राकेश सोमाणी, राममिलन यादव, उमेश कुंडले, सुरज सिंग ठाकूर, राममिलन यादव, सेवासिंग कालरा, जसवंत सिंग, धर्मप्रकाश दुबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहराला तहसीलचा दर्जा देण्याबाबत आलेल्या अडचणींचे प्रवास वर्णन केले. ‘बल्लारपूरला तहसीलचा दर्जा देऊ न शकल्यास राजकारण सोडण्याची शपथ घेतली होती. पण बल्लारपूर येथील कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या बळावर असाध्य वाटणारे कार्य देखील साध्य झाले,’ असे ते म्हणाले.
केंद्र आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त भगीनींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख ८ हजार भगिनींच्या खात्यात १५०० रुपये लवकरच जमा होणार असल्याचेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने नंतर राज्य सरकारने आता लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना याचा लाभ होणार आहे. शिक्षणात गरिबी अडसर ठरू नये यासाठी मुलींना मोफत उच्च शिक्षणाची योजना देखील महाराष्ट्र सरकारने आणली आहे. कामगार बांधवांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून दर्जेदार हॉस्पिटल तयार करण्यात येत आहेत. बल्लारपूरच्या नजीक १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय तयार होत आहे.
बल्लारपूर मधील अनेकांना घरांचे पट्टे नसल्याची मोठी समस्या आहे. किमान १२ हजार नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यादृष्टीने कार्यवाही होईल, असा विश्वासही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. जात-पात, धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना विविध योजना आणि विकास कामांचा लाभ मिळावा यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन देखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.