प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे शाखा वर्धा द्वारा आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय शांताई सभागृह तळेगाव श्यामजीपंत येथे पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांची मांदियाळी तळेगाव श्यामजीपंत येथे पाहायला मिळाली.
त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांनी उद्घाटन केले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजय खडसे कवी तथा समीक्षक आदिवासी साहित्य अभ्यासक तसेच अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष नरेंद्र गुळघाने ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक प्रमुख अतिथी शिवा प्रधान तथा विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
या उद्घाटन सत्रामध्ये “साहित्यही पुणे एकाची जहागीर नसून साहित्य ही समाजमनाचा आरसा आहे म्हणून साहित्याची जोपासना मनामनात व्हावी.” असे प्रतिपादन शरद गोरे यांनी केले. तर “महात्मा फुले फोटोच्या नव्हे तर विचाराच्या रूपाने घराघरात पोहोचावे यासाठी साहित्य संमेलने होणे आवश्यक आहे” असे मत शिवा प्रधान यांनी मांडले. डॉ. अजय खडसे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये “साहित्य अन्यायाच्या विरुद्ध विद्रोह करण्याची इच्छा निर्माण करणारे आहे आणि अन्यायाला न्यायामध्ये बदलण्याचे काम साहित्य करते म्हणून ते लोकसाहित्य असो की कुठलीही साहित्य असो. ते निर्माण करण्याचा अधिकार हा कुण्या एका समाजाचां नसून सर्वांचा आहे.” ही भूमिका अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. अजय खडसे यांनी विचार मांडली.
उद्घाटकीय कार्यक्रमानंतर परिसंवाद आयोजित करण्यात आला यावेळी पद्माकर मांडवधरे यांनी संचालन केलं तर साहेब खंदारे यांनी आपले विचार मांडले राष्ट्रसंतांची राष्ट्रभक्ती या विषयाच्या अनुषंगाने अत्यंत मार्मिकपणे सहभागी वक्त्यांनी बाजू स्पष्ट करून सांगितली.
“होय मी महात्मा फुले बोलतोय!” सुशील दत्त ज्येष्ठ रंगकर्मी अमरावती यांचा सुंदर असा एकपात्री प्रयोग सादर झाला. पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र निमंत्रिताचे कवी संमेलन होते सर्व महाराष्ट्रभरातून आलेल्या निमंत्रित कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. सूर्यकांत नामुगडे ज्येष्ठ कवी पुणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजया मुळे, किशोर टिळेकर, महेंद्र गायकवाड ही मंडळी होती. या बहारदार कवी संमेलनाचे संचालन चंद्रशेखर तरारे युवा कवी यांनी केले. यावेळी नरेंद्र गांधारे, आदित्य गोमटे सचिन पवार, देशमुख ज्ञानेश्वर धायरीकर बाळकृष्ण अमृतकर कैलास तेलंग यासह सर्वांत बऱ्याच मान्यवर कवींचा सहभाग होता.