कराड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कराड:- काल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत प्रचंड बहुमत प्राप्त केले. राज्यातील एकंदरीत वातावरणामुळे हा विजय अनेकांच्या पचनी पडत नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या विजयामागे आणखी एक एँगल आहे असं सांगितलंय.
कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, झारखंडमध्ये भलेही भाजपला पराभवाचं तोंड बघावं लागलं असेल. परंतु या निवडणुकीला आणखी एक एँगल आहे. मला याबाबत काही सहकारी सांगत होते. चार महिन्यापूर्वी एक निवडणूक झाली. हरियाणा आणि जम्मू काश्मीरची. जम्मू काश्मीरमध्ये भाजपविरोधात जे आमच्यासारखे पक्ष आहेत, त्यांना यश आलं आणि हरियाणामध्ये भाजप जिंकलं.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, त्यानंतरची ही महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक एकत्र झाली. महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा उशिराने झाली, महाराष्ट्राची निवडणूक झारखंडबरोबर झाली. निकालानंतर तसंच झालं. झारखंडमध्ये भाजपला अपयश आणि महाराष्ट्रात यश आलं. याचा अर्थ एक लहान राज्य दाखवण्यासाठी पराभूत व्हायचं आणि मोठ्या राज्यात सत्ता मिळवायची. उद्या कुणी ईव्हीएम मशीनच्या संबंधाने विरोध करू नको म्हणून ही खेळी खेळायची.
शरद पवारांनी सांगितली महायुतीच्या विजयाची कारणं: पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी दिलेला नारा भाजपच्या कामी आला. महायुतीच्या लोकांनी लाडकी बहीण योजनेबद्दल खोटा प्रचार केला, ही योजना बंद होईल असं सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण निर्माण झालं. परंतु आता मी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार आहे, असं पवारांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत कुणी किती जागा जिंकल्या?
भाजपा महायुती- 230
भाजप-132, शिवसेना- 57, राष्ट्रवादी काँग्रेस- 42
काँग्रेस महाविकास आघाडी – 46
काँग्रेस – 16, शिवसेना (उबाठा) – 20 राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) – 10