उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाच्या शिल्पाची विटंबना करणारी घटना घडली होती. त्यात आंदोलन करणारे एलएलबी चे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी विद्यार्थ्यांचा कारागृहात मृत्यू झाल्याने आंबेडकरी समाजात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात आहे. त्यात सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, दि. 10 डिसेंबर रोजी परभणी येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाच्या शिल्पाची जाणुनबुजुन तोडफोड करण्यात आली. त्यानंतर ११ डिसेंबर २०२४ रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली. हा बंद शांततेच्या मार्गाने होत असताना परभणी जिल्हा प्रशासनामार्फत बंद करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला. भिमनगरच्या वस्त्या वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली बहुजन लोकांवर लाठीचार्ज करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
पोलीसामार्फत भीमनगर मधील लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या. कॉम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरवादी तरुणांना जेलमध्ये टाकण्यात आले, कोणताही दोष नसणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यातून शिकलेल्या आंबेडकरवादी तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कॉम्बिंग ऑपरेशन मधून काल दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी एलएलबी चे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी विद्यार्थ्यांचा पोलिस कस्टडीत खून करण्यात आला. तरी आमची मागणी आहे की, परभणी येथे झालेल्या प्रकरणात जबरदस्तीने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. भिमनगर वस्तीवर ज्या पोलिसानी लोकांच्या गाड्या फोडल्या, निष्पाप लोकांवर लाठीचार्ज केला अश्या पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले जावे तसेच त्याच्यावर खटले चालविण्यात यावे अन्यथा सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी