देवीदास सातपुते यांनी अधिकारी व परिवहन विभागाचे मानले आभार
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी,दि.२७ सप्टें:- गोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोडसा बस सेवा कित्येक महिन्यांपासून बंद होती. ज्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे प्रचंड नुकसान होत होते. बस सेवा सुरू करण्यासंबंधी तालुक्यातील अनेक नेत्यांनी पुष्कळदा निवेदन दिलेत, आंदोलन करण्याचे इशारे पण दिले. परंतु सदर बाबतीत कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही.व बस सेवा सुरू करण्यासंबंधी परिवहन महामंडळाने कुठलेही पाऊल उचलले नव्हते. दरम्यान पोडसाचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिनांक २६ सप्टेंबर २०२२ सोमवार पर्यंत बस सेवा सुरू करावी अन्यथा दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोज बुधवारला परिसरातील सरपंच, पदाधिकारी व विद्यार्थी, नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. देविदास सातपुते जी यांच्या रास्ता रोको आंदोलन इशाऱ्याची परिवहन विभागाने दखल घेतली आणि दिनांक २७ सप्टेंबर रोजी सदर मार्गाने वाहन योग्य प्रकारे चालू शकते की नाही? रस्त्याची अवस्था बस वाहतुकीस योग्य आहे काय? याबाबतचे इन्स्पेक्शन करण्यात आले आणि दिनांक २७ सप्टेंबर २०२२ पासून गोंडपिपरी-धाबा -पोडसा – बस सुरू करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या नियोजित शैक्षणिक वेळेनुसार उद्या दिनांक २८ सप्टेंबर २०२२ बुधवारपासून गोंडपिपरी वरून पहाटे ५:१५ ते पोडसा सकाळी ६:१५ ला पोहचेल , गोंडपिपरी वरून सकाळी ८:३० ते पोडसा सकाळी ९:३० ला पोहचेल, गोंडपिपरी वरून दुपारी १:३० ते पोडसा दुपारी २:३० ला पोहचेल, गोंडपिपरी वरून सायंकाळी ५:०० ते पोडसा सायंकाळी ६:०० ला पोहचेल. तरी सदर मार्गावरील पोडसा, वेडगाव,सोनापूर, सकमूर, गुजरी, नांदगाव सर्व, हिवरा, धाबा, मंगलपेठ, डोंगरगाव, सोमनपल्ली, दुभारपेठ, गोजोली, यासह मार्गावरील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांनी या नियोजित वेळेनुसार प्रवासासाठी तयारी ठेवावी. अशी माहिती परिवहन महामंडळाच्या विभागाकडून देविदासजी सातपुते यांना कळविण्यात आली.
धाबा तोहगाव क्षेत्रातील गोंडपिपरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा पोडसाचे सरपंच देविदास सातपुते हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून परिसरातील विविध समस्या शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करण्यात यशस्वी झालेले आहेत. क्षेत्रातील सर्व सामान्य नागरिकांना विविध मार्गाने ते सतत मदत करत असतात, यापूर्वीसुद्धा कोविड कालावधीत लॉक डाऊन दरम्यान परराज्यात अडकलेल्या कित्येक मजुरांना त्यांनी स्वगृही आसरा दिला होता.या सत्कार्याची त्यांना पावती मिळाली व त्यांचा जिल्हा स्तरावर मा. पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील देवदूत नावाने प्रसिद्ध झालेल्या देविदास सातपुते यांच्या समाजकार्याची आणि रास्ता रोको आंदोलन इशाऱ्याची दखल घेऊन धाबा – पोडसा मार्गावरील बस सेवा सुरू करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. व धाबा पोडसा बस सेवा सुरू सुद्धा झाली.
परिवहन महामंडळ विभागांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व धाबा – पोळसा बस सुरू केल्याबद्दल देविदास सातपुते जी यांनी अधिकाऱ्यांचे व परिवहन विभागाचे आभार व्यक्त केले.व बुधवारला होत असलेला रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय मागे घेण्यात येत आहे अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

