मानवेल शेळके अहिल्यानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन अहिल्यानगर:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरातील औसरकर मळा येथे वीज तारेचा झटका बसून सातवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सृष्टी गणेश दुर्गिष्ट वय 13 वर्षे असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेश दुर्गिष्ट यांच्या घराच्या जवळून वीज महावितरण कंपनीच्या 11 केव्ही विजेच्या तारा गेल्या आहेत. दुर्गिष्ट यांच्या घराजवळ पोल वाकलेला आहे. मृतक सृष्टी ही दुसऱ्या मजल्यावर असताना तिचा हात विद्युत तारांना लागला. त्यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजता घडली. त्यानंतर तातडीने तिला उपचारासाठी आनंदऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
महावितरणवर गुन्हा दाखल करण्यात यावा: वीज महावितरणच्या अक्षम्य चुकीमुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. तसेच, महावितरण कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही निवेदनाद्वारे कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये केली आहे.

