✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी
मुंबई, 30 सप्टेंबर:- मागील काही महिन्यापासून शिंदे गट आणि शिवसेना यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेसह ठाकरे घराण्यातील नेत्यांनी आगपाखड करण्यास सुरूवात केली. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना असा वाद सुरू झाला. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात सहभागी झाल्या. ठाण्यात येत रश्मी ठाकरेंनी देवीची महाआरती केली. यावेळी रश्मी ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
एकनाथ शिंदे यांनी मागच्या कित्येक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आमचे दैवत असल्याचे सांगत. पुढची राजकीय दिशा ठरवत आहेत. दरम्यान अचानक रश्मी ठाकरे यांनी ठाणे येथील टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतल्या नंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. रश्मी ठाकरेंनी केलेल्या महाआरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवीचे दर्शन कोणीही घेऊ शकतो. रश्मी ठाकरे यांनीही दर्शन घेतले असेल, तर चांगली गोष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ते माध्यमांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले, देवीचे दर्शन घेण्यास कोणालाही बंदी नाही. दर्शन सर्वांनीच घेतले पाहिजे. त्यांनीही देवीचे दर्शन घेतले असेल तर चांगलीच बाब आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

