✒️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- तालुक्यातील अंभोरे येथील दोघा जणांनी ग्रामसेवकाची गचांडी पकडून गावात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेले साफसफाईचे काम रोखण्यास भाग पाडले. ग्रामसेवकाच्या हातातील मासिक सभेची नोंद वही फाडून फेकली. याप्रकरणी अंभोरे येथील दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ग्रामसेवक अरुण जेजूरकर हे ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचार्यांकडून गावातील गल्लीबोळात सफाईचे काम करवून घेत होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सफाई करुन कचरा जमा केला जात असताना अचानक गावातील नवनाथ धोंडीबा हाळनोर आणि लहानू केरु खेमनर हे दोघे दुचाकी वरुन तेथे आले. त्यांनी आपले वाहन आडवे लावून ‘काम बंद करा, येथे साफ सफाईची गरज नाही, तुम्ही येथून लगेच निघून जा..’ असे म्हणत शिवीगाळ व दमबाजी केली. ग्रामसेवक जेजुरकर यांनी तेथील काम बंद करुन स्मशान भूमी परिसरात साफ सफाईचे काम सुरू केले. काही वेळातच दोघे पुन्हा तेथे आले. त्यांनी स्मशानभूमीचे प्रवेशद्वार बंद करीत ग्रामसेवक जेजुरकर व कर्मचार्यांना बाहेर जावू द्यायचे नाही,’ असे म्हणत नवनाथ हळनोर याने जेजूरकर यांची गचांडी पकडली व धक्काबुक्की करीत त्यांना दमबाजी केली.