राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील मानखुर्द पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अरबी शिकवणीसाठी येत असलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शिक्षिकेच्या पतीने लैगिंक अत्याचार केला. ही 13 वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेच्या पतीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
मानखुर्द पोलिसांनी 31 वर्षीय नराधम आरोपीस बेड्या ठोकल्या असून सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 45 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबीयांसोबत मानखुर्द परिसरात राहते. तिला 13 वर्षांची एक मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. डिसेंबर 2024 ते जून 2025 या कालावधीत तिची मुलगी तिच्याच गल्लीत राहणार्या एका महिलेकडे अरबी शिकण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळेस झोपण्यासाठी जात होती. यावेळी या महिलेच्या पतीने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे केले होते. याशिवाय तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केला होता.
हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. याच संबंधातून ही मुलगी गरोदर राहिली होती. मेडीकलमध्ये ती गरोदर असल्याचा रिपोर्ट प्राप्त होताच हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या महिलेने शेजारीच राहणार्या 31 वर्षांच्या आरोपीविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरेपीस पोलिसांनी अटक केली असून सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.

