मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील मौजा कोल्ही येथे शेषराव उर्फ राजु विठ्ठल पाझारे याचे ताब्यात गांजा अंमली पदार्थ असल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे पोलीसांनी पंचासमक्ष एनडीपिएस कायद्यान्वये कार्यवाही करून त्याचे मोटर सायकलचे सिट खाली १६६ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळुन आल्याने जप्त करून आरोपी विरूध्द वडनेर पोलिस स्टेशन येथे अप. क्र. ८०/२०२५ कलम ८ (क), २० (ब) ii (अ) एन.डी.पि.एस ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनकडून अटक करण्यात आलेल्या शेषराव उर्फ राजु विठ्ठल पाझारे हा सदरचा गांजा माझा नसुन कोणीतरी मला फसविण्याच्या उद्देशाने माझे गाडीच्या सिट खाली ठेवल्या बाबत वांरवार सांगत होता. त्यामुळे सदर गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे वरिष्ठांकडुन आदेश प्राप्त झाले. त्याप्रमाणे आरोपी शेषराव उर्फ राजु विठ्ठल पाझारे, वय ४५ वर्षे, रा. कोल्ही त. हिंगणघाट जि. वर्धा यास पो.स्टे. वडनेर येथे बोलावुन सविस्तर विचारपुस करून त्याचे बयाण नोंदविले.
यावेळी पोलिसांना त्याने सांगीतले की, त्याचे गावातील शाकेत डंभारे हा अवैद्य रेती विक्रीचा व्यवसाय करीत असतो त्याचे ट्रक्टर नदी पात्रातुन चोरीची रेती वाहतुक करीत असतात. सदर ट्रक्टरची माहीती मी पोलीसांना दिली व त्यावरून पोलीसांनी शाकेत डंभारे याचे ट्रक्टरवर कारवाई सुध्दा केली आहे. मी अनेकवेळा पोलीसांना फोन करून त्याचे रेती चोरी बाबत माहीती दिली. ही बाब शाकेत डंभारे याचे लक्षात आल्याने तो माझा राग करत होता व मला फसविण्याच्या, उद्देशाने दि. २७ फेब्रुवारी २०२५ व दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान माझे मोटर सायकलचे सिंटखाली गांजा ठेवला व दि. ०५ मार्च २०२५ रोजी पोलीसांना गांजा बाबतीत खबर देवुन माझेवर गांजाची खोटी केस करायला लावुन मला फसवीले असे पोलिसांना सांगितले.
सदर बयानावरून शाकेत अजाबराव डंभारे, वय ३५ वर्षे, रा. कोल्ही यास पोलिस स्टेशन वडनेर येथे बोलावुन सखोल विचारपुस करून बयाण नोंदविले असता त्याने सांगीतले की, “माझेकडे रेतीचा ऑर्डर आणी रेतीचा रॉयल्टी बंद असल्यास ग्राहकांना नांदोरा घाटातून नदीपात्राची रेती चोरून विकी करतो. आमच्या गावात माझ्या एकटया जवळच ट्रक्टर असल्याने गावात व आजुबाजुचे गावात मी एकटाच रेती विक्री करतो. माझा घराशेजारी शेषराव उर्फ राजु पाझारे हा राहतो. मी नदीपात्रातून ट्रॅक्टरमध्ये चोरून लपून रेती आणायला गेलो तर शेषराव पाझारे याने माझा गाडीची तहसिलदार हिंगणघाट व पोलिस निरीक्षक वडनेर व पोलीसानां माहीती देवून अनेकदा माझा रेतीचा ट्रॅक्टर पकडून दिलेला होता. त्यामुळे माझे खुप नुकसान झालेले होते.
मी अनेकदा त्याला राजु पाझारे याला समजावून सांगीतले. परंतू पाझारे हा मला “पूर्ण मातीत सोडल्याशिवाय राहणार नाही” असे म्हणून माझे गाडीची पोलीसांना व तहसिल कार्यालयाती लोकांना नेहमी माहिती देवूर्त गाडी पकडून देत होता. त्यामुळे माझे खुप मोठे नुकसान झाले हो त्यांला कोणत्याही परिस्थीतीत नियंत्रणात आणने आवश्यक होते. खुप दिवसापासुन तो माझ्या कचाटयात कसा सापडेल याच्या मी प्रयत्नात होतो. अंदाजे १५ दिवसापुर्वी पिपरी पारधी बेड्यातील पारधी व्यक्ती कडुन पाझारे याला गांजाच्या केसमध्ये फसविण्याकरीता गांजा घेवुन ठेवला होता.
पोहणा येथे महाशिवरात्रीची मोठी यात्रा भरते त्या यात्रेत शेषराव पाझारे हा कुटुंबासह जाणार याची मला खात्रीशीर माहीती मिळाल्याने मी यात्रेत गेलो असता शेषराव पाझारे हा त्याचे मोटार सायकलवर कुटुंबासह यात्रेत आला होता. मला तो पार्कीग मध्ये गाडी लावतांना दिसला. मी माझी मोटर सायकल पार्कीगमध्ये लावुन त्याचे मोटर सायकल जवळ गेलो. मी त्याचे मोटार सायकलची सिट माझे जवळील पान्याने खोलून माझ्या जवळ असलेला गांजा च्या पुडया त्याचे सिट खाली ठेवून सिट लावून ठेवली होती.
शेषराव पाझारे हा मला गावात त्याची स्प्लेंडर मोटार सायकल घेवून फिरतांना दिसल्याने शेषराव पाझारे हा त्याचे मोटार सायकलवर गांवात गांजा विक्री करतो व सदरचा गांजा त्याचे मोटार सायकलचे सिट खाली आहे. अशी माहीती माझ्या जवळील मोबाईलने पोलीसांना मॅसेज करून दिली होती. मी दिलेल्या माहितीवरून वर्धा येथील पोलीस आले व त्यांनी शेषराव पाझारे यास मी त्याचे मोटार सायकलचे सिटखाली ठेवलेल्या गांजासह पकडले व त्याचेवर कारवाई करण्यात आली.
माझा रेतीचे ट्रॅक्टरची पोलीसांना व तहसिल कार्यालयाला माहीती देवून माझे खुप मोठे नुकसान केल्याने मी रागापोटी शेषराव पाझारे याचे मोटार सायकलचे सिट खाली पारधी बेडयावरून आणलेला गांजा ठेवलेला होता. मी शेषराव पाझारे याचा बदला घेण्याकरीता व त्याला खोट्या गुन्हयात फसविण्याकरीता गांजा त्याचे गाडीत लपवुन ठेवला व त्याची पोलीसांना माहीती दिली.” असे बयाण नोंदविण्यात आले.
तरी आरोपी नामे शाकेत अजाबराव डंभारे याने त्याचे अवैद्य रेती चोरीच्या गाड्या बाबत शेषराव पाझारे याने पोलीसांना माहीती दिली व त्यावरून पोलीसांनी कारवाई केली. याचा राग मनात धरून स्वतः गांजा अंमली पदार्थ आणुन शेषराव पाझारे यांचे मोटर सायकलच्या सिटमध्ये लपवुन ठेवुन पोलीसांना स्वतः फोनव्दारे माहीती देवुन शेषराव उर्फ राजु विठ्ठल पाझारे याचेवर गांजाची खोटी केस करायला लावुन त्यास फसवीले असे तपासात निष्पन्न झाले आहे.

