विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी परिसरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कालच दोन वेगवेगळे अपघात घडले. एक इसम जारावंडीपासून कांदळी नाल्याजवळ दुचाकीने अपघातग्रस्त झाला, तर दुसरा अपघात जारावंडी पासून वडसाखुर्द गावाजवळ घडला. सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ मार लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. तरीही अशा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
जारावंडी परिसरात वाढणाऱ्या अपघातांच्या मागे दारू हे मोठे कारण ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. जारावंडी सह आसपासच्या गावांमध्ये दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन महिन्यांपूर्वी जारावंडी पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून राहुल आव्हाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावात दारूविक्रीवर कठोर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे गावात मोठ्या प्रमाणात शांतता निर्माण झाली होती आणि दारूमुळे होणारे वाद, मारामाऱ्या तसेच अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले होते. त्यावेळी गावातील महिलांनी ठाणेदार यांचे मनःपूर्वक आभार मानत, त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले होते. महिलांना गावात एक नवीन आशेचा किरण दिसला होता आणि नागरिकही निर्धास्तपणे जगू लागले होते.
मात्र, दुर्दैवाने आता परिस्थितीत पुन्हा बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत दारूविक्री पुन्हा सुरू झाली असून, त्याचाच परिणाम रस्त्यावर वाढणाऱ्या अपघातांमध्ये स्पष्ट जाणवतो आहे. मद्यप्राशन करून बेपर्वा पद्धतीने वाहन चालवणे सुरू असल्यामुळे हे सर्व घडत आहे.

