मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
वर्धा, :- संपूर्ण राज्यात 1 जुलै पासुन एकल प्लास्टिकचे उत्पादन, वितरण व विक्री यावर बंदी आहे. असे असतांना वर्धा येथील एमआयडीस क्षेत्रात छुप्या पध्दतीने एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन होत असल्याची माहिती मिळाल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर येथील पथकाने धाड टाकून प्लास्टिकचा साठा जप्त केला व कारखान्याच्या मालकावर कारवाई केली आहे.
ही कारवाई महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नागपूर येथील प्रादेशिक अधिकारी अशोक करे, उप प्रादेशिक अधिकारी आनंद कोटोले यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र अधिकारी मनोज वाटाने यांनी केली आहे. शासनाने प्लास्टिकच्या वापरामुळे होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी 1 जुलै पासुन एकल प्लास्टिकचे उत्पादन, वितरण, विक्री व वापर यावर बंदी घातली आहे. याचे उल्लघन करणा-यावर कारवाईची तरतुद करण्यात आली आहे.
वर्धा येथील एमआयडीसी क्षेत्रात छुप्या पध्दतीने एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन सुरु असल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे मंडळाच्या पथकाने काल दि.27 जुलै च्या रात्री 7.30 वाजता एमआयडीसी येथील मे. ओम प्लास्टिक या कारखान्यावर धाड टाकली. यावेळी कारखान्याचे मालक संजय शादिजा यांच्या या कारखान्यात 1 टन प्रतिबंधित एकल प्लास्टिक आढळून आले आहे. एकल प्लास्टिकसह एकुण दिड टन माल धाडीच्या कारवाईत जप्त करण्यात आला. बंदीचे उल्लेघन केल्या प्रकरणी कारखाना मालकावर प्राथमिक दंड 10 हजार रुपये इतका आकारण्यात आला असल्याचे नागपूर येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने कळविले आहे.