मानसिक आरोग्याविषयी जनजागृती व सामाजिक कलंक निर्मूलनाचा संदेश.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- कल्याण नर्सिंग कॉलेज, राजुरा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साह, सर्जनशीलता आणि सकारात्मकतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. आदर, समज आणि काळजी! या अर्थपूर्ण संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनमोहक रांगोळ्या आणि विचारप्रवर्तक पोस्टर सादरीकरणे सादर करून मानसिक आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. रांगोळ्यांतून मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि आनंदी जीवनाचे संदेश उमटले, तर पोस्टर्समधून मदत मागणे ही कमजोरी नव्हे, तर धैर्याचे प्रतीक आहे आणि मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असे समाजाभिमुख विचार व्यक्त करण्यात आले.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना म्हटले की, नर्सिंग व्यवसाय हा केवळ रुग्णसेवेशी मर्यादित नसून मानसिक आरोग्य संवर्धनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. भावी परिचारिका म्हणून विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करावा.
शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य विषयी जनजागृती वाढविण्याचा आणि समाजात संवेदनशीलतेचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला.

