महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- 14 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर याचा प्रभाव होणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचा आत्मविश्वास वाढलाय. असे चित्र दिसत असताना मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप होणार आहे. भाजपसह इतर पक्षांची चिंता वाढवणारी बातमी हाती आलीय. कारण राज्यातील राजकारणात नव्या पक्षाची प्रवेश झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून निर्माण झालेला नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची धामधूम सुरु असताना राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडलीय. राजकारणात आता नवीन पक्षाची एंट्री झालीय, तो म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)
ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांनी या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षाची स्थापना केलीय. आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यांनी एनपीपीची स्थापना केली. भारतातील आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे.
2023 मध्ये मेघालय विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात हा सर्वात मोठा पक्ष ठरला व नॅशनल पीपल्स पार्टीला 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचीही मान्यता मिळाली. प्रादेशिक असला तरी सध्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. मेघालयसह, मणिपूर, नागालँड, झारखंड व असाम या राज्यात या पक्षाचा दबदबा आहे व सध्याही मेघालय मध्ये एन पी पी या पक्षाचे कोरांड संगमा हे मुख्यमंत्री आहेत. या पक्षाने एनडीए सोबत काही राज्यात युती केली आहे.
मात्र आता या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केलीय. नुकतच दिल्ली येथे मेघालयचे मुख्यमंत्री कोराड संगमा यांनी महाराष्ट्रात या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदी अमित वेळूकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे एनपीपी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित वेळूकर हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एनपीपी पक्ष आदिवासी भागात आपले उमेदवार देणार आहेत.

