अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- रेखडे विद्यालय पिपळा (किनखेडे) येथे आयोजित शालेय स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. अरविंदजी धवड,सचिव मोहपा एज्युकेशन सोसायटी, मोहपा यांनी अध्यक्षस्थानी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. कैलास लोखंडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळमेश्वर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी श्री. निशिकांत भोरे संचालक मोहपा एज्युकेशन सोसायटी, श्री. शमशुद्दीन शेख प्राचार्य न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोहपा, श्री. अमोल फुलारे सरपंच ग्रामपंचायत पिपळा (किनखेडे), श्री.प्रशांत कापसे, उपसरपंच ग्रामपंचायत तसेच श्री. युवराज गावंडे अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ रेखडे विद्यालय यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.
या स्नेहसंमेलनाचा पहिला आकर्षक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले तंत्रज्ञानाधारित व नवोन्मेषी प्रकल्प उपस्थितांनी कौतुकाने पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंत धकिते यांनी करत विद्यालयाच्या प्रगतीचा आणि माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाचा आढावा घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन श्री. डेबे यांनी प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमातील प्रमुख क्षणांपैकी एक म्हणजे अध्यक्षीय भाषण. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मा.अरविंदजी धवड यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय सहकार्य करावे, ही विनंती मांडली. त्यांनी पुढे बोलताना, “शक्य असल्यास माजी विद्यार्थ्यांनी विद्यालय दत्तक घेण्याचा विचार करावा,” असे सूचक व प्रेरणादायी आवाहनही केले.
यावर प्रतिसाद म्हणून माजी विद्यार्थी श्री. कळसाईत यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ठाम शब्दांत आश्वासन देत म्हटले की, “शाळेच्या विकासासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी निश्चितच सहकार्य करू.” या कार्यक्रमामध्ये उत्साह, बांधिलकी व एकात्मतेचा सुंदर मेळ दिसून आला. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. गुणवंतांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी, तसेच शाळेच्या विकासासाठीच्या चर्चा यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. पालक, ग्रामस्थ, शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

