प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वर्धा जिल्हा शासकीय रुग्णालयातील इमारत क्र. 2 मधील दुसऱ्या माळयावरील स्टोअर रुमला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्टोअर रूमला लागलेल्या आगीत रुममधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.
वर्धा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीची माहीती मिळताच वर्धा नगर परिषदेच्या अग्नीशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले आहे. या घटनेत कुठलीही जिवित हानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या इमारतीत तळ मजल्यावर क्ष-किरण व सि.टी. स्कॅन विभाग आहे तर पहिल्या माळयावर स्त्रीशल्य विभाग तर दुसऱ्या माळयावर बालरुग्ण विभाग आहे. याच विभागाच्या शेजारी असलेल्या स्टोअर रुमला आग लागली. या घटनेच्या वेळी स्टोअर रुमच्या बाजूच्या विभागात 10 बालकांवर उपचार सुरु होते. त्यावेळी तेथे रुग्णांसह 30 ते 33 नातेवाईक सुध्दा होते. आग लागल्याचे कळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली व स्टोअर रुमच्या बाजूला असलेल्या बाल रुग्ण विभागातील तसेच पहिल्या माळयावर असलेल्या स्त्री रुग्ण विभागातील सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
आग लागली त्यावेळी स्टोअर रुमच्या बाजूला असलेल्या 30 ते 35 लोकांना कुठलीही झळ न पोचता सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवित हानी झालेली नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा घटनेची शक्यता नाकारता येत नसल्याने व त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवता यावे यासाठी आग नियंत्रक उपाययोजनांची व्यवस्था केली असतांना व शासनाचे तसेच कडक निर्देश असतांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग नियंत्रणासाठी बसविलेली यंत्रणा कुचकामी ठरली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बाहेरुन अग्नीशमन दलाची वाहने बोलवावी लागली.
सध्याचे निकषानुसार ज्या ठिकाणी मानव संचार आहे जसे, शासकीय दवाखाने, चित्रपट गृहे, मॉल, बस स्टेशन, रेल्चे स्टेशन, महाविद्यालये इत्यादी गर्दीच्या ठिकाणी आग नियंत्रण सुरक्षा व्यवस्था असणे सक्तीची असतांना सुध्दा केवळ शासन निर्णयात आहे व त्याचे पालन करणे बंधनकारक आहे म्हणून केवळ आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्या साहित्याची व्यवस्था केली जाते. परंतु त्याच व्यवस्थेची कधीच देखरेख केली जात नाही. त्यामुळे ही यंत्रणा या ठिकाणची शोभेची वस्तू ठरते आहे.

