अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- अखिल विश्व गायत्री परिवार, शांतीकुंज हरिद्वार यांच्या वतीने आयोजित ज्योती कलश यात्रेचे गुरुवार २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सावनेर येथील साई मंदिरात थाटामाटात आगमन झाले. अध्यात्मिक वातावरणात मंत्रोच्चार, भजन व आरतीसह या यात्रेचे स्वागत करण्यात आले.
ज्योती कलश यात्रेचा मुख्य उद्देश समाजात संस्कार, सद्विचार, संयम, सेवा व अध्यात्मिक जागृती निर्माण करणे हा असून गायत्री महामंत्राच्या प्रसारातून नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येतो. शांतीकुंज हरिद्वार येथून प्रज्वलित झालेला अखंड दीपक या ज्योती कलशाच्या माध्यमातून देशभर भ्रमण करीत असून विविध गावांमध्ये भक्तिभावाने त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
सावनेर येथे साई मंदिर मित्र परिवाराच्या वतीने ज्योती कलश यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थितांनी गायत्री महामंत्राचा सामूहिक जप केला तसेच मानवात देवत्वाचा विकास व समाजात शांती निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी वक्त्यांनी गायत्री परिवाराच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, समाजातील अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, नैतिक अधःपतन यावर मात करण्यासाठी अध्यात्म व संस्कारांची नितांत गरज आहे. ज्योती कलश यात्रा ही त्याच दिशेने मार्गदर्शन करणारी असून युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शेवटी साई मंदिर मित्र परिवाराच्या वतीने सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांततामय व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला.

